Tuesday, February 19, 2013

झोपायला घेतली जरीची साडी ! 

          लग्न म्हणजे  घाई गडबड गोंधळ आलाच. त्याच्या गमती जमती आल्या. अशीच एक गमतीशीर घटना माझ्या आत्याच्या लग्नात घडली होती . माझी आत्या " मंगल आत्या" हिचे लग्न ठरले साधारण  १ ९ ९ २ साली तेव्हा आम्ही शाळेत शिकत  होतो. मी तेव्हा ८ वी  मध्ये असेन. कोल्हापूरला मे महिन्याच्या दिवसात तिचे लग्न ठरले होते. आम्ही सारी बच्चे कंपनी जाम खुश होतो कारण आम्हाला फारच धमाल करायला मिळणार होती. कोल्हापूरला आमचा स्वतंत्र छोटसं घर आहे. तिथे तेव्हा वरती मोठी गच्ची होती. तिथे आम्ही खूप खेळायचो. घरातील काही जास्तीच असणार सामान देखील तिथेच ठेवलं होत. लग्न घर असल्यामुळे तिथे अंथरूण-पांघरूण ठेवली होती. कपडे वाळत घालण्याची ती हक्काची जागा होती. 
         लग्नाला केवळ २ दिवस सीमांतपूजन धरून उरले होते. हॉल मधील व्यवस्था पाहण्यासाठी म्हणून माझे वडील, आजोबा  आणि काका हि सर्व मंडळी बाहेर गेली होती.  आम्ही मुले अंगणात खेळत होतो. सर्व बायका घरात कामाच्या गडबडीत होत्या. आणि संध्याकाळच्या सुमारास अचानक जोरदार वादळ सुटल आणि गारांचा पाउस पडायला सुरवात झाली. भरपूर गारपीट झाली. आम्ही सारे जमेल तसे गारा  वेचून खाण्यात मग्न होतो. अंधारून गेल्यामुळे आम्ही घरात गेलो. कपडे ओले, रस्ते ओले. सगळे चिखलाचे पाय घरात यायला लागले तशी काकू वैतागली. दरम्यान लाईट हि गेले होते. त्यामुळे पायपुसणे शोधण्यासाठी तिची धावपळ सुरु झाली. ते काही केल्या तिला सापडेना. मग आम्हाला तिने विचारले कुठे पहिले का ? ठेवले का? मग कोणीतरी पाय घसरून पडेल म्हणून आम्ही हि शोधायला सुरवात केली. आणि अचानक आमच्या लक्षात आले कि सर्व अंथरूण पांघरूण आणि अशाच काही गोष्टी गच्ची मध्ये ठेवल्या आहेत. काकूला सांगितलं तेव्हा आईने आणि काकूने कपाळाला  हात लावला अग्गोबाई ! म्हणजे आता ते सर्व भिजून गेले असेल , मग आपण झोपणार कशावर ?  पांघरणार काय ? आई चिडली आणि म्हणाली कोणी हा प्रकार केला? आता आजोबा पण चिडतील. पाउस  येण्याची शक्यता लक्षात घेऊन तिथे पांघरून ठेवायची नाहीत अस ठरवलं होत सर्वांनी, मग कोणी ठेवली ? सर्वजण  शांत बसले.
       त्यानंतर जवळ पास दोन तासांनी घरातील सर्व पुरुष मंडळी घरी आली. त्यांना हा प्रकार सांगितला. मग माझ्या बाबांना आठवले कि सकाळी अंगणात काहीतरी काम होते म्हणून त्यांनीच ती वर ठेवायला सांगितली होती.  थोड्या वेळाने ती परत खाली ठेवू असा त्यांचा विचार होता , पण कामच्या गडबडीत ते विसरले  यावर सगळेजण हसू लागले .
        मग  आईने विचारले , "पण आता आणखीन पाहूणे  येणार तर मग झोपायचे कशावर ? आणि पांघरायचे काय?" आजोबा हसून म्हणाले , " आता झोपा  जर काठच्या साड्या पांघरून. आणि खरोखरच आम्हाला साड्या वर झोपायला लागले .
लग्नाच्या दिवशी काय घालायचे ते मग पाहू असे ठरले.

Monday, February 18, 2013


माझ्या कॅलेंडर मध्ये  फेब्रुवारी नंतर जानेवारी !

           इतका सावळा गोंधळ होऊन देखील पुन्हा पास काढताना मी जरा गाफील राहिले. हिशेब व्यवस्थित  पहिला पण तारीख काही निट पहिली नाही  आणि तिथेच खूप मोठा गोंधळ झाला. तर वाचक मित्रहो, माझा पहिला घोळ तर तुम्हाला माहीतच आहे.
          दुसऱ्या वेळेस काय झाल कि, संध्याकाळी  घाई गडबडीच्या वेळीस मी पास काढायला गेले होते. अजूनही मला हे कळाल नाही कि  नेमकी माझ्या वेळेस पास केंद्रावर गर्दी कशी काय असते ? मी नेहमीप्रमाणे पास काढला. निरखून बघणार तोच माझी  बस आली आणि घाईघाई ने जागा पकडण्यासाठी मी पळतपळत बस कडे गेले. नंतर बसण्याच्या गडबडीत पास चेक करण्याचा राहून गेला. (तो माझी फजिती होई पर्यंत मी चेक केला नव्हता). असे जवळपास ८-१० दिवस होऊनही गेले असतील. एकदा आमची बस नेहमी प्रमाणे ग्यास भरायला गेली होती. आणि आम्ही मुकाट्याने दुसरी बस बदलून डेकन्नला उतरलो. मला वाटत ती कोथरूडला जाणारी बस होती.
         चेकर समोर आल्यावर त्याला पास दाखवला त्याने तो पहिला आणि मला दिला म्हंटल चला सुटलो एकदाचे या गोंधळातून. तर तो म्हणाला , " म्याडम , बघू तुमचा पास परत एकदा !".  मी आश्चर्याने त्याला परत पास दिला. "अहो ! हा पास तर चुकीचा आहे. " आता मात्र माझाच चेहरा गोंधळल्यासारखा सारखा झाला. एव्हाना बस मधले सर्व  प्रवासी उतरून निघून गेले होते. आणि बसही गेली होती. " कधी काढला पास तुम्ही? " जरासे दरडावून त्याने विचारले. मी म्हणले, " अहो, आत्ता आठ दहा दिवसांपूर्वीच तर काढला. मग तो जरा हसून म्हणाला, " अहो म्याडम, चुकी तुमची नाही तर ती पास काढणारयाची आहे. त्याने बाकी पास बरोबर लिहिला आहे पण महिना चुकीचा टाकला आहे !" ती तारीख त्याने मला दाखवली  हे  पहा,  ३० जानेवारी ते २८ फेब्रुवारी  असा पास हवाना  !  मग  तो  ३० जानेवारी ते २८  जानेवारी  असा लिहिलाय ! अरेच्चा तर घोळ हा झाला होता तर..... मी मनातल्या मनात कपाळाला हात लावला. 
         एव्हाना इतर चेकर हि जमा झाले होते. मी आणि माझी मैत्रीण वैदेही दोघी वैतागलो होतो. "मग आता काय करायच?" मी विचारले. तो म्हणाला या पासची झेंरॉक्स काढून द्या, मी  तक्रार नोंदवतो. " मग मी आणि वैदेही  हताशपणे एकमेकींकडे पाहत  झेंरॉक्स काढण्यासाठी फिरू लागलो. तो चेकर पुढे, आम्ही दोघी त्याच्या मागे अशी आमची वरात फिरत होती .
       सगळी झेंरॉक्सची दुकाने बंद. ती नेहमी उशीराच  उघडतात. बस स्टोपवरही गर्दी होती. सगळे जण आमच्याकडे विचित्रपणे पाहू लागले. होते. थोड्यावेळाने त्याला कुठून तरी झेंरॉक्स काढून मिळाली. नंतर त्याने सर्वांसमक्ष माझ्याकडून त्याच्या हुकुमाप्रमाणे अर्ज लिहून घेतला. मग आमची स्वारी परत पास केंद्र कडे गेली. तिथल्या बाईने तो पास दुरुस्त करून दिला. आणि आम्ही हुश्श ! करून आपापल्या  कामाला गेलो. दरम्यान त्याने तुम्ही शिकलेली  माणस  अस वागता. तुम्ही पास चेक  करायला पाहिजे. अस बरच  काही मला सुनावल होत . आम्ही होतो म्हणून तुम्हाला जास्त त्रास झाला नाही, नाही तर दूसरे  लोक असते तर खूप त्रास झाला असता, वैगरे वैगरे.

Thursday, February 14, 2013

पास काढण्यात मी नापास !

          मी रोज गेली किती तरी वर्ष बहुदा १६ तरी असावीत बसने प्रवास करते. त्यामध्ये गेली ८  वर्षे मी महिन्याला पास काढते. एखादी गोष्ट हि आपल्या सरावाची झाली कि आपण त्याबाबत किती बेफिकीर असतो किंवा काही गोष्टी कशा गृहीत धरतो आणि त्याचा दुष्परिणाम आपल्याला कसा भोगावा लागतो याचा अनुभव एकदा नव्हे तर चक्क दोनदा मी घेतला.
               त्याचं असं  झाल कि, मध्यंतरी बसच्या तिकिटाचे भाव वाढले. आधी महिनाभर पास काढल्यामुळे मला  नव्याने पास काढायाच्या वेळेस  वाढीव दर नक्की काय असेल  याचा अंदाज बांधता आला नव्हता.  सहज पणे,  स्वतः जराही तसदी न घेता "किती पै से होतात हो ?" असे मी  पास काढणाऱ्यास विचारले. इतक्या लोकांच्या हिशेबात हरवलेल्या त्या पी एम टी च्या माणसाने अंदाजे ६२० रुपये असे सांगितले. नेहमी प्रमाणे बसचा नंबर  वैगरे सांगून झाल्यावर त्याने पास दिला जराही हिशेबी विचार न करता मी त्याला पैसे दिले आणि लवकर काम झाल्याच्या खुशीत घरी परत आले. संपूर्ण महिना माझा अशा प्रकारे गेला. 
                 पुन्हा पुढच्या महिन्यात पास काढण्यासाठी मी गेले नेहमीप्रमाणे त्याला पास दिला आणि पैसे काढून दीले . पाच - दहा मिनिटे शांततेत गेली , मी विचार केला  हा माणूस असा विचित्र काय वागत आहे? त्या माणसाने पासकडे  आणि माझ्याकडे संपूर्ण न्याहाळून पाहिले मग म्हणाला " म्याडम हा पास तुम्ही स्वतः काढलात का?" मी आश्चर्याने हो म्हणाले. "का हो ?" गरजेपेक्षा जास्त चौकशी करणाऱ्या माणसाचा  मला रागच येतो. "मग तुम्ही नीट तपासला नाहीत वाटत ?" असे त्याने विचारातच मात्र मी गोंधळुन गेले. एव्हाना त्याच्या बोलण्याचा रोख मला हळूहळू लक्षात यायला लागला होता . माझा गोंधळ उडालेला पाहून तो म्हणाला , " अहो म्याडम, हा पास चुकीचा आहे. आता तर  माझ्या मागे उभे असणारे लोकहि वैतागले होते. पण आता काहीतरी वादग्रस्त घडणार म्हणून तेही आमच्याकडे उस्तुकतेने  पाहू लागले. पुढे गर्दीचा अंदाज घेत तो पटकन म्हणाला, " तुम्ही जास्त पैसे दिले आहेत. तुमच्या मार्गाचे पैसे एवढे होत नाहीत. फ़क़्त ५७६ होतात. तुम्ही हिशेब केला नाहीत का ? बसच्या तिकिटाचा दर फ़क़्त एक रुपयाने वाढला मग एवढे पैसे तुम्ही कसे दिलेत ? तुम्ही शिकलेली लोक जरां  पास भरताना नीट बघत जा. " मग त्याने मला सर्व मार्गाचे हिशेब करून दाखवले . मी निरुत्तर होते. मग त्याने माझ्या कडून योग्य ते पैसे घेतले आणि मला नवा पास दिला. माझ्याकडून अर्ज लिहून घेतला. मागे उभे असणारे लोक त्याच्याकडे अभिमानाने आणि मझ्याकडे धांदरटच दिसते अशा नजरेने पाहत होते. 
      शेवटी स्वताची चूक स्वतालाच भोवल्याने मी सर्व अहंकार बाजूला ठेवून त्याचे आभार मानले. माझ्या धांदरटपणाबद्दल मला खूप हसू आले. असा धांदरटपणा पुन्हा करायचा नाही असे मनोमन ठरविले. पण पुढील आणखी विनोदी प्रसंगाने ते खोटे ठरविले.