Sunday, September 15, 2013

Shifting to new location

I'm shifting the blog to more appropriately named location - truptisartgallery.blogspot.in. Please bookmark it and visit it for latest blog posts.

Sunday, May 5, 2013

Surya Devo Namo Namha!

सुर्य देवो नमो नमः 

कोणी म्हणत देव आहे कोणी म्हणत नाही . आहे नाही च्या या संघर्षात सत्य पडताळून पाहायला आज वेळ  आहे कुणाला ? मग यावर उपाय काय ? खरोखर देव काय केवळ मंदिरात किंवा देव्हाऱ्यात आहे कि अजून कुठे आहे ? शोध घ्यायचं ठरवलं आणि आजूबाजूच्या वातावरणा कडे जरा निरखून पाहिलं. जे दिसलं जाणवलं ते लिहून ठेवलं . एक छोटासा प्रयत्न . मला दिसू पाहणारा देव पहा तुम्हाला दिसतो का ?  

आज मला मावळतीचा सूर्य खूपच आवडला. किती मनोहर रंग दिसत होते आकाशात. निळा , केशरी, पिवळसर, काळपट सर्व रंग एकमेकांच्या सीमा सांभाळत आकाशात जमले होते. वाटल, अरे  आज काय रंगाची मैफिल आहे का काय ? सूर्याच ते अस्ताला जाण पाहताना वाटलं कि जणू एखाद खोडकर मुल दिवसभर आपल्या अंगणात खेळतंय,  अन आता आईची हाक येतीये म्हणून घरी जातंय.  सूर्याची रूपं तरी किती दिसावीत या उन्हाळ्यात ? सकाळचा लडिवाळपणा , हळूहळू जवळ येउन कुशीत शिरणारी त्याची किरणं मग ऐन दुपारी माथ्यावर आल्यावर तरणाबांड  अन सळसळत्या उत्साहाने संपूर्ण चराचरावर स्वतः च वर्चस्व गाजवणारी त्याची किरणं , संध्याकाळी दमून भागून सार काही अनुभवाने जाणून हळूहळू आपल साम्राज्य आवरू लागलेली त्याची किरणं. पण त्यात निराशा नाही तर पुन्हा नव्या  उत्साहाने, नव्या जोमाने प्रगट होण्याचा त्याचा निश्चय दिसतो. खरच हा निसर्गच आपल्याला सार काही शिकवतो नाही का ? 

दिवस रात्र , वर्षानुवर्ष हा खेळ रोज चालू आहे. कसल्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता हा सुर्य रोज आपल्यासाठी उगवतो अन मावळतो देखील केवळ आपल्याच सुखासाठी. त्याच्या अस्तित्वाने तर सार जीवनच फुललंय. नवनिर्मितीची प्रक्रिया होते. उर्जा मिळते. देवत्व किंवा देव या पेक्षा वेगळा कुठे असतो नाही का ?   

Friday, March 22, 2013

ti........... bhag 5

ती ……………………… भाग ५ 

घरी आल्या नंतर मी घरातल्या सर्वाना सांगितलं कि आज ती मला भेटली होती आणि तिला मी ते पुस्तकही दिल. ती जाम खुश होती. सर्वाना बर वाटलं. मला आता उत्सुकता होती कि तिच्या घरी गेल्यावरची परिस्थिती काय असेल. फारच आतुरतेने मी दुसरया दिवसाची वाट बघत होते . अखेर  तो दिवस उजाडला घाईघाईने सार काही आटोपून मी बस कडे गेले. नेमकी बस लागलीच होती नाईलाजाने मी बस मध्ये चढले वाटलं आज काही तिची माझी भेट होत नाही . 
एवढ्यात दीदी म्हणून हाक कानावर पडली वळून पहिल  तर ती बसली होती . ती ने मला जवळ बोलावलं बसायला जागा दिली  आता आम्ही दोघी अगदी शेजारी बसून गप्पा मारू लागलो.  ती उत्साहाने सांगू लागली घरी गेल्यावर ती ने ते पुस्तक घरच्यांना दाखवलं , त्यांना हि ते आवडल. तिच्या आईने मला तिच्या घरी चहाला आमंत्रण दिल होत.  मी म्हणलं आता लगेच शक्य नाही पण कधीतरी नक्की येईन हो मी. मग तिला विचारलं वाचलस का पुस्तक हो म्हणाली , माझ्या जवळ एक अजून दुसर  पुस्तक होत म्हणल," वाच ! बघु जमत का तुला ?" पुस्तकाच नाव तिने बरोबर वाचून दाखवलं. पण आतला मजकूर वाचताना मात्र ती अडखळली . मग मी तिला तो वाचून दाखवला. अशा प्रकारे  एक आठवडा भर आमचा अभ्यास  बस मध्ये चालू होता.  आता ती बऱ्या पैकी वाचत होती थोडस लिहण्याचा प्रयत्न चालू होता तिचा.  
कानडी लोक माझ्यामते बोलताना तरी एकच लिंग वापरतात. आपण कस तो आला , ती गेली , ते थांबले आहेत वैगरे म्हणतो त्या ऐवजी ते एकच लिंग नपुसक लिंग वापरतात असा मला बरेच वेळा आढळल आहे. जस कि ते माणूस चढला बघा, ते बाय किती वरडत होत इत्यादी. त्याबातीत तिला किती हि वेळा मी समजावलं तरी ती सवयीने घोळच घालायची . याबाबतीत एक किस्सा घडला. 
एके  दिवशी बस मध्ये घाईत चढत असताना एक आजी खाली पडल्या ते कुणाच्याही लक्षात आलं नाही .    नेमक हीच लक्ष गेल आणि हि ओरडायला लागली , "ए कंडक्टर भवा (म्हणजे भाऊ)  , ते पडल बघा पडल रे! ते जोरात ! (तिला काय पडल ते पटकन सांगता येईना , ) ते  पडलं बघा बस मधून कि खाली. तिच्या लिंग भेद न करण्यामुळे नक्की काय पडल ते पटकन कोणाच्या हि लक्षात येईना. कोणाच काय पडल म्हणून सगळे वैतागले कंडक्टर म्हणाला काय झाला घोटाळा ! आणि पाहतात तर एक आजी पडल्या  होत्या.  त्या घाबरल्या होत्या. चालू होत असलेली बस थांबली त्यासरशी हिने टूणकण उडी मारली त्या आजींना हाताला धरून उठवल,  बस मध्ये चढवल, बसायला जागा दिली.  मला म्हणाली, " किती ओरडत होत मी तरी कोणी लक्ष देईना बघा".  तिच्या बोलण्यातला गोंधळ मी तिला समजावत होते ते पाहून बस मधले सगळे तिच्या  बोलण्याने हळूहळू हसत होते. 
मग ती म्हणाली दीदी आता माझ इथल काम संपल आता मी दुसरी कडे जाणार कामाला.  पण मी इथेच राहणार आहे . तुम्हाला भेटायला , मराठी शिकायला येत जाईन  मी . मला वाईट वाटलं .मग मी तिला तिच्या कामाच्या ठिकाणी सोडलं, पुढे आले आणि  विचार केला हि आता संध्याकाळी भेटली कि जाव हिच्या घरी आज म्हणजे मला कधी वाटल तर तिला भेटता येइल . मग माझं मलाच बर वाटलं . 
नंतर मी खूप दिवस वाट पहिली तिची आतुरतेने पण ती काही आली नाही कि तिच्या मैत्रिणीही  दिसल्या नाहीत कि तिचा निरोप हि आला नाही. कुठे आणि कस शोधाव तिला ? मला भेटायचं तिला ! या गोष्टीला आता ३ वर्ष झालीत पण मी अजूनही तिच्या शोधत आहे आणि अजूनही ती माझ्या मनात घर करून आहे ? कोणी शोधून देईल का तिला ?  

ti ..............bhag 4

ती ……………भाग  ४ 

पुस्तक देण्या-घेण्याच्या गोष्टी नंतर चार-पाच दिवस आमच्या दोघींची काही भेट झाली नाही. एक अर्थी ते बरच झाल कारण माझ्याकडे लगेच जाऊन पुस्तक आणायला वेळच नव्हता. पण त्या काळात मी ते पुस्तक आणले आणि तिची वाट पाहू लागले. पण त्यानंतरही ती दोन-तीन दिवस काही भेटली नाही. मग माझ्या मनाला रुखरुख लागली. हि गेली कुठे ? तिला बर नाहीये कि काय ? असे प्रश्न मला सतावू लागले. पण तिच्या मैत्रिणी तर दिसत होत्या ! मग हीच कुठे गायब झाली ? बर तिच्या मैत्रीणीना माझी भाषा कळण जसं अवघड तसं त्यानाही माझ बोलण कळण अवघडच कि. शेवटी ठरवलं बघू तरी प्रयत्न करून. संध्याकाळी तिच्या मैत्रिणींशी संवाद साधला. आणि कळल कि ती दुसरीकडे कामाला गेली आहे. मग त्यांच्या बरोबर मी तिला निरोप दिला म्हणाव, दीदी आठवण काढत होत्या त्यांना भेटायला ये. 
त्यानंतर जवळ पास दोन-तीन दिवसांनी ती दिसली. नेहमीप्रमाणे मला पाहताच बोलायला आली. मी अगदी उत्साहाने ते पुस्तक तिला दिले. तिने ते फार हळुवारपणे हातात घेतले. जणू काही ती फार अनमोल अशी गोष्ट होती तिच्यासाठी. आतमध्ये तिचे नाव देखील लिहून ठेवले होते मी. त्याचे तिला फारच अप्रूप वाटले. "माझ्यासाठी दिलेलं हे पहिला बुक आहे हा   दीदी ". हे सांगतानाचा तिचा चेहरा मला आजही आठवतो.  मी म्हणलं , " आता हे नीट  वाच , काय कळणार नाही ते मला विचार मी सांगेन तूला समजावून. जर हे पुस्तक तुला नीट समजल आणि तुला मराठी नीट यायला लागल कि बाहेरून आपण तुला दहावी च्या परीक्षेला बसवु . पाहू आता काय होतंय ते. " तिला फारच आनंद झाला. "मला पहिल्या पासून मराठी शिकायचं दीदी". "ठीक आहे तू तुझ्या सवडीने वेळ काढ तुला एकदम भारी मराठी शिकवण्याची जबाबदारी माझी. " हे ऐकताच तिचे ते पाणीदार डोळे एकदम लकाकू लागले. त्या गडबडीत तिने मला धन्यवाद दिले नाहीत हे तिच्या थोडे पुढे गेल्यावर लक्षात आले. मग मला मोठ्याने हाक  मारून , दीदी ! आणि नमस्काराची खुण तिने केली. तिची ती धन्यवाद मानण्याची पद्धत मला फारच निरागस वाटली. मनाच्या अतिशय आनंदी आणि प्रसन्न अवस्थेत आम्ही दोघी आपापल्या घरी गेलो.   

Thursday, March 21, 2013

Ti.......... bhag 3

ती ………………. भाग ३ 

आता तर काय तिची अन माझी रोज भेट होत होती दर वेळेस ती माझ्याशी जणू आपला हक्कच आहे अशा थाटात बोलत होती . बोलण्याचे विषय दरवेळेस वेगळे वेगळे असायचे . आजुबाजू च्या नवनवीन तांत्रिक गोष्टी मध्ये तिला खूपच रस होत. सारख हे काय ते काय विचारात असे. मोबाईल , कॉम्पुटर या बाबत तिला आकर्षण होत. तिचा भाऊ कॉम्पुटर मध्ये हुशार आहे अस  तीच मत होत. तो खूप जिद्दीने शिकत होता.  तिने तिच्या भावाशी माझी ओळख करून  दिली . 
एकदा गप्पांच्या ओघात मी तिला सहज विचारलं , " काय ग तू तशी हुशार आहेस कि कामात, मग तुला पुढ शिकावस का नाही वाटल ?" यावर ती म्हणाली , " दीदी शिकाव अस खूप वाटत पण काय करणार ? आमची परीस्थीती हि अशी , कि मला नुसते शिकता  येणार नाही आणि काम करून शिकायला मला जमत नाही कारण इथली भाषा वेगळी मला मराठी समजत पण लिहिता येत नाही, माझी भाषा कन्नड. कोण मला निट समजावून सांगणार ? आणि आता माझ वय पण शाळेत जाऊन शिकण्याच नाही. मग काय करू ? समदी मानस अगदी माझ्या कामावरील  ठेकेदार देखील म्हणतात कि तू शिक हुशार आहेस,तू पुढे जाशील. पण काय करू सांगा." तिचा रडवेला चेहरा मला पाहवत नव्हता. पण अगदी त्याक्षणी मी देखील काहीच करू शकत नव्हते . 
विषय बदलण्यासाठी मी म्हणल, "अग आपण इतक्या छान गप्पा मारतोय, पण मला अजून तुझ नाव देखील माहित नाही. नाव काय तुझ? " आता काहीतरी कन्नड अवघड असा नाव ती सांगेल असा मला वाटल . पण गोड आवाजात ती म्हणाली," रेखा ". "वा ! एकदम झकास नाव आहे कि तुझ अगदी तुला साजेल अस. "  यावर ती मनापासून हसली. मग मी तिला सांगितलं तू माझ जरा ऐकशील का ?" कसलाही विचार न करता ती लगेच हो म्हणाली त्याच मला जरा आश्चर्य वाटल ." तू तंबाखू खाण सोडून दे. मग मी तुला एक बक्षीस देईन." लहान मुलासारखे तिचे डोळे लकाकले. काय देणार तुम्ही मला ? तिने निरागसपणे विचारले. "एक छान पुस्तक". "पण मला कुठे येणार ते वाचायला ? तुम्ही कन्नड पुस्तक देणार का ? " मी म्हणाले , " हो कन्नड पुस्तक पण मराठी कस बोलाव, वाचव हे शिकवणार ". यावर तिला आनद झाला . "कधी देणार आज ?  "  तू तंबाखू सोडलीस याची मला खात्री पटली कि देणार." यावर मला काही कळायच्या आत तिने कमरेची पुडी काढली आणि फेकून दिली . मला आश्चर्याचा धक्का बसला . पण मी तिला सागितलं माझ्याकडे आत्ता लगेच पुस्तक नाहीये पण मी तुला दोन तीन दिवसात आणून देइन. ठीक आहे म्हणाली.  मग तिचा सबंध प्रवास अगदी आनंदात गेला. सारखी ती तिच्या मैत्रीणीना काही तरी सांगत होती आणि तिचा कानडी कलकलाट चालू होता . 
आणि आता पुस्तक कधी आणि कोणत  आणावं या विचारात माझा प्रवास चालू होता.………   

ti .......bhag 2

ती ……………. भाग २

नेहमीप्रमाणे दिवस कामात व्यस्त जात होते आता तिची आणि माझी जरा  गट्टी जमली होती. रोज संध्याकाळी आणि सकाळी तिची भेट होऊ लागली होती . बरेच वेळा माझ्या आधीच ती आलेली असायची. मी येताना दिसले कि आपण होऊन पुढे यायची . " नमस्ते दीदी ! काल बस मध्ये लई गर्दी होती ना? तुम्हाला जागाच भेटली नाही. " मी म्हणल , " हो ना ! काय करणार , चालायचच . " थोडा वेळ शांततेत गेला. मग तिचे ते टपोरे डोळे उत्साहाने बोलू लागले. काहीतरी तिच्या कन्नड  भाषेत ती बरोबरीच्या तिच्या मैत्रिणीला सांगू लागली . बहुदा ते आमच्या दोघी बद्दल बोलण असाव . 
रोज आम्ही दोघी भेटलो कि आम्हाला एकमेकींशी बोलताना पाहून आजूबाजूचे इतर लोक आमच्याकडे आश्चर्याने पाहत असत. तिच्या मैत्रीणीना नवल आणि कौतुक वाटे . त्यांचे चेहरे पाहून समजत असे. त्या जरा अलीकडे तिला बिचुकून असतात , अस आपल मला वाटे . कारण ती होतीच तशी त्या सगळ्यांपेक्षा वेगळी.  तिच्या चेहऱ्यावरून तिच्या बुद्धिमत्तेबद्दल अंदाज बांधता येत होत. खास  करून तिचे डोळे पाणीदार आणि मासोळी सारखे लांब होते. तिच्या व्यक्तीमत्वात एकूणच चपळपणा, तरतरीतपणा  जाणवे . जणू काही सर्व गोष्टी आपल्याला जमू शकतात नि समजू शकतात अस  तिच्या वागण्यातून जाणवे तो निश्चितच गर्व नव्हता , आत्मविश्वास होता. कारण तिच्या बोलण्यात आणि वागण्यात देखील नम्रपणा होता . सकाळ असो कि संध्याकाळ असो ती कायम फ्रेश कशी याचे मला नवल वाटे . कारण तिचे काम तसे कष्टाचे होते . 
अशीच तिच्या बद्दल विचार करण्यात मी दंग होते तेव्हढ्यात तिचे माझ्या हातातल्या अक्कलकोट स्वामीच्या अंगठी कडे लक्ष गेले  आणि ती एकदम ती ओरडली , " दीदी !" काय झाले मी एकदम दचकले. "तुमच्या हातात हि अंगठी कोणाची ? ते स्वामी आहेत ना !" मी म्हणले " हो " पण हिला स्वामी माहित असतील का नाही ते मला माहित नव्हते त्यामुळे मी म्हणले, " सोलापूर जवळ ते एक अक्कलकोट म्हणून गाव आहे  नं  तिथले हे स्वामी आहेत त्याची हि अंगठी आहे. " " मला माहित आहेत जी ते स्वामी , मी  मूळ  अक्कलकोटचीच राहणारी आहे . आम्ही तिथे होतो ना तेव्हा रोज मठात जायचो . " तिच्या चेहऱ्यावरून आनंद अगदी ओसंडून वहात होता . जणू काही तिला तिच्या गावातलीच कोणी तरी व्यक्ती भेटली आहे. आता मात्र मलाच आनंद झाला होता कारण स्वामींवर आमची घरातल्या सर्वांची अपार श्रद्धा आहे. आणि हि देखील स्वामी भक्त निघाली तर . मला आता तिच्याबद्दल जास्त जिव्हाळा वाटू लागला.  
तिला अजून बोलते करण्यासाठी मी म्हणले , " तू काही शाळा शिकली आहेस का ग ?" यावर मान  डोलावून ती म्हणली 'हो ' पण ती जरा गंभीर झाल्यासारखी वाटली.  पण मला आता शांत बसवेना मी लगेच पुढे तिला विचारलं , " किती शिकलीस ?" यावर तिने आपले पाणीदार डोळे  रोखून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली , " एडसड   ". मला काही कळेना हि अशी काय बोलतीये आता आजूबाजूचे लोकही एकदम आमच्याकडे पाहू लागले  . मला एकदम ओशाळवाणे झाले . मी म्हंटल, "काय ? मला नाही समजल काय शिकालीये?" यावर तीही जरा वेळ गोंधळली  असावी जरासा विचार करून म्हणाली , " ते इंग्लिश मध्ये नसत का हो दीदी अठ चा  वर्ग ."  दोन मिनिटांनी तिच्या बोलण्यातला उद्देश माझ्या लक्षात आला आणि मला खूप हसू आले. माझ्याकडे पाहून तीही हसू लागली, मला म्हणाली,  "काय झाल दीदी तुम्ही का हसता ?" मी म्हणल अग तू आठवी शिकली आहेस का ? परत ती माझ्याकडे बघू लागली . मग मी हाताच्या खुणे तिला आठ आकडा करून दाखविला तिला लगेच कळल. ती हो म्हणाली . मग मी तिला विचारलं . " तू एडसड अस का सांगितलस ?" तिच्या नंतरच्या बोलण्यावरून मला कळाल कि तिला  8th std अस सांगायच होत पण ते तिला नीट सांगताच आल नाही. तेव्हढ्यातच आमची बस आली आणि पुन्हा आमचा संभाषणाचा धागा तुटला.  

Wednesday, March 20, 2013

ti....bhag 1

ती ……… भाग १ 

नेहमी प्रमाणे कामावर जात असताना मला ती भेटली . उंच आणि रेखीव बांध्याची,  सावळ्या  रंगाची , नीट -नेटकी राहणारी, आत्मविश्वास आणि गोड हसू चेहऱ्यावर असणारी , नजर  चौकस आणि धीट अशी असणारी . मी बसला उशीर होतोय म्हणून वैतागले होते. आजूबाजूला बघत होते तेव्हाच खर तर मी तिला पाहिलं होत , तिच्या व्यक्तिमत्वामध्ये काही खास आहे असा एका नजरेत जाणवत होतच पण  वैतागले  असल्याने, असेल कोणी तरी म्हणून मी दुर्लक्ष  केल. 
"दीदी बस इधर कब आयेगी ?  कितनी देर  हुई  है ."  अस म्हणत ती माझ्या जवळ आली. आवाजातला गोडवा जाणवून मी पाहिले तर तीच होती ती ! तिला कसलही  उत्तर देण्याच्या फंदात न पडता मी सरळ २-३ मिनिटे तिच्याकडे पाहून घेतल. तशी तीही मला बघत असावी असा मला वाटलं आणि माझा कयास खरा ठरला. मी काहीच बोलत नाही अस पाहून ती म्हणाली ' " में कब से आपको देख रहि हु . आप इधर से रोज जाती है ना  !"
आता आश्चर्य चकित होण्याची वेळ माझ्यावर आली होती. तिच्याशी हिंदीत बोलायच विसरून जाऊन मी तिला मराठी मध्ये म्हणाले , " हो . पण मी रोज काही एव्हढी उशिरा जात नाही मग तू कस काय  मला पाहतेस?" "मैने शामको इधर आते हुये आपको देखा है." अरेच्चा हि तर रोज संध्याकाळी माझ्या बस मध्ये असेल तर मला दिसत कशी नाही अस मला प्रश्न पडला .
मग माझ्या लक्षात आल कि हिला तिच्या प्रश्नाच उत्तर द्यायचं राहून गेल आहे. मी काही बोलणार तोच पुढे ती म्हणाली, "आज बसला फारच टाईम झाला . रोज ची या येळेची कटकट आहे. " अरे वा ! हिला मराठी बोलता येत की.  मग मी तिला म्हटल, " हो ना ! काय करणार बस चा त्रास या रूट ला जर जास्तच आहे. "   मला वाटल हिला कळाल असेल का त्यावर लगेच ती म्हणाली , " दुसऱ्या साईड ला सारख्या बस आहेत. हिकडच बोंब असते निसती. " माझ्याच मनातले विचार पण जरा वेगळ्या भाषेत ती बोलून दाखवत होती. माझा वैताग एकदम कमी झाला .
पण माझी उत्सुकता  मात्र जागी  झाली. मी तिला विचारले . " काय ग तू बिल्डींगच्या कामावर जातेस ना ? " तिचा तो  टीपीकल ड्रेस पाहून दुसरी कुठली शंकाच येत नव्हती .  " हो !"   उत्तरासरशी ती पचकन थुंकली. मला काही ते आवडल नाही ते तिने माझ्या चेहऱ्या वरून ताडलं असाव . "स्वारी दीदी !" एकदम ओशाळवाण्या स्वरात ती म्हणाली.  तेवढयात बस आली आणि बसमध्ये बसण्याच्या गडबडीत आमचा संवाद तुटला. पण एका नवीन नात्याला सुरवात मात्र झाली होती . …… आणि पुढे त्या नात्याने एक छान वळण घेतल.